मुंबई - दहशतवादी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांवर शिवसेनेने मुखपत्र सामनातून जोरदार निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्या नेत्यांचा फुटीरतावाद पोसला जात आहे. या लोकांना पाकिस्तानातून रग्गड पैसा पुरवला जात आहे. अशा बांडगुळांची फक्त आर्थिक नाकेबंदी किंवा त्यांच्या नाड्या आवळून उपयोग नाही तर त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी, असे म्हणत सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी याने काश्मीरवरून हिंदुस्थानला धमकी दिली आहे. त्याने काश्मीरमध्ये दहशतवाद भडकविणारा संदेश सोशल मीडियावर जारी केला आहे. तर सय्यद गिलानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हे महाशय ‘आपण पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आपला आहे,’ असे गरळ ओकताना दिसतात. यावरुनच सेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांचे लक्ष काश्मीरचा तुकडा पाकड्यांच्या घशात घालण्याचे
दहशतवादी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी या दोघांचे ‘लक्ष्य’ काश्मीरचा तुकडा पाकड्यांच्या घशात घालण्याचे आहे. त्यासाठी एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्यांचा फुटीरतावाद पोसला जात असल्याचे सेनेने म्हटले आहे.
सगळे फुटीरतावादी एकाच माळेचे मणी
इस्लामी दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके किंवा त्यांच्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये वळवळ करणारे फुटीरतावादी हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटना या देशाच्या उघड उघड शत्रू आहेत. मात्र गिलानी, आसिया अंद्राबी, बिलाल लोन, मीरवाइज उमर फारुख आणि इतर फुटीरतावादी नेत्यांनाही वेळोवेळी पाकप्रेमाचा पान्हा फुटत असतो. गिलानी यांचा हा व्हिडिओ काश्मीरमधील कोणत्या भागाचा आणि कधीचा आहे, याचा नेमका तपशील समोर आलेला नाही. मात्र त्यापेक्षा गिलानी यांनी सोडलेले हिरवे फूत्कार निघत असल्याचे गिलानी यांनी म्हटले आहे.
गिलानींनी पाकिस्ताणात जाऊन राहावे
गिलानींना एवढेच पाकप्रेमाचे भरते आले असेल तर त्यांनी आपले येथील बूड हलवावे आणि पाकिस्तानात जाऊन राहावे असेही सेनेने म्हटले आहे. एकीकडे कश्मीरचा लचका तोडून पाकड्यांच्या घशात घालण्यासाठी कारस्थाने करायची. तर दुसरीकडे स्वतःच्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात ठेवायचे आणि कश्मिरी तरुण-तरुणींची माथी मात्र हिंदुस्थानद्वेषाने भडकवायची. आमच्या सैनिकांवर फेकण्यासाठी त्यांच्या हातात दगड द्यायचे. स्वतःच्या मुलांना घडवायचे आणि काश्मिरी तरुणांना बिघडवायचे. असे वर्षानुवर्षे काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे धंदे चालू असल्याचेही सेनेने म्हटले आहे. त्यामुळे अशा लोकांची आर्थिक नाकेबंदी करून किंवा त्यांच्या नाड्या आवळून उपयोग नाही. तर त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी असे सेनेने म्हटले आहे.