मुंबई - राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी सकाळी जालना जिल्ह्यातील चारा छावणीला भेट देणार आहेत. तसेच शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेतून अन्नधान्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मदत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जून रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील साळेगाव येथील चारा छावणीत उपस्थित राहणार आहे. यावेळी शिवसेनेकडून चारा छावणीतील शेतकऱयांकरिता बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना सुरू करणार आहे. तसेच पाऊस पडेपर्यंत अन्नधान्याचे वाटप सुरू ठेवण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. राज्यातील जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांत देखील चारा छावण्या आहेत.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचाही दुष्काळी दौरा -
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या सकाळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, अक्कलकोट आणि बार्शी, सांगोला, माळशिरस, माढा, मंगळवेढा आणि पंढरपूर या तालुक्यातील चारा छावण्यांना भेट देणार आहे. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱयांना अन्नधान्यांचे वाटप करतील. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालूक्यातील हंडुग्री, वालवड, चिंचपुरढगे या दुष्काळग्रस्त गावांनाही भेटी देवून दुष्काळी पाहणी करणार आहेत.