मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच दादर येथील शिवसेना भवनात एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.
दादर येथे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या कार्यालयातील एका ज्येष्ठ शिवसैनिकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या वृत्ताला शिवसेना भवनातून अधिकृत दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे आता सॅनिटायझेशन प्रक्रियेसाठी शिवसेना भवन बंद असणार आहे. काही दिवसांनी पुन्हा शिवसेना भवन नेहमी प्रमाणे सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्येही शिवसेना भवनात महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती असते. चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 54वा वर्धापनदिनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री एकनाथ शिंदे तसेच काही शिवसेना नेते उपस्थित होते.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या चालकालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी राज यांचे अंगरक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.