मुंबई - हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणावरून आता शिवसेना आक्रमक झाली. आज शिवसेनेच्यावतीने शिवाजी पार्क ते चैत्यभूमी परिसरात आंदोलन करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासह उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठिक ठिकाणी मोर्चे निदर्शने केली जात आहे. पीडितेला न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी शिवसेनाही राज्यभर निदर्शने करत आहे. आज शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक, आमदार ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर
उपस्थित होते. उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शने करत योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आमदार सदा सरवणकर आणि पदाधिकाऱ्यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून प्रथमच शिवसेनेची हाथरस विरोधातल्या पिढीतेला न्याय देण्यासाठी हे मोठं आंदोलन व निदर्शन केल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी केली असून ती फार चुकीची होती. तसेच मुंबईत एक अनाधिकृत बांधकाम तोडल्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. पण हाथरस सारख्या प्रकरणी आता कोणीही भाजप नेते बोलत नाहीत यांनी आता काहीतरी बोलावे, आता आपला आवाज बसला का ? असा सवाल देखील यावेळी भाजपला विचारण्यात आला.