मुंबई: याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समाज आहे. तिथे आपले मराठी भवनसुद्धा आहे. मॉरिशस सरकारच्या वतीने आता तेथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा १४ फूट उंचीचा पुतळा बसवण्यात येणार आहे. येत्या २८ तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
'त्या' भवनासाठी राज्य शासनाकडून देणगी: मॉरिशसमध्ये असलेल्या मराठी भवनाला २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने देणगी दिली होती. आता त्या भवनाचा दुसरा टप्पा तयार करायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणगी स्वरुपात ८ कोटी रुपये दिले आहेत. तेसुद्धा तिथे देण्यात येणार आहेत. सोबतच तेथे मराठी लोकांचे सम्मेलनसुद्धा होणार आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस काही सामंजस्य करारांवरसुद्धा स्वाक्षरी करणार आहेत. तसेच पर्यटन व उद्योग क्षेत्रातसुद्धा महत्त्वाचे करार अपेक्षित असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठमोळे सण उत्साहात: मॉरिशसमध्ये असणाऱ्या मराठी बांधवांची संख्या जवळपास ७५ हजार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, पुणे, रत्नागिरी या भागातून गेलेले बरेच मराठी बांधव आहेत. या सर्वांनी परदेशातही मराठी परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम केले असून येथे जवळपास मराठी बांधवांच्या ५४ संघटना आहेत. या सर्वांनी एकत्र येत १ मे १९६० रोजी 'मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन' स्थापन केले. या फेडरेशनद्वारे महाराष्ट्र दिन, शिवजयंती, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी असे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जातात. अशामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा तेथे बसवण्यात येणार असल्याने या मराठी बांधवांच्या आनंदात अजून भर पडणार आहे.
चिखलीत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण: छत्रपती शिवरायांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे गोव्यातील चिखली येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अनावरण 7 जून, 2022 रोजी झाले होते. मुरगावच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने हा पुतळा स्थापन केला असून, याची उंची 23 फूट आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून हिंदू समाजाच्या वतीने देशातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी करण्यात आले. पोर्तुगिज साम्राज्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी प्रखर लढा दिला होता. म्हणूनच पोर्तुगिजांपासून गोवा सुरक्षित राहिला. हिच भावना गोवेकरांच्या मनाशी आजही घट्ट बांधून आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यावर असलेले उपकार आणि त्यांनी पोर्तुगिजांच्या तावडीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी केलेली सुरुवात, यामुळे गोवेकर नेहमीच राजांचे ऋणी असल्याचे सावंत आपल्या भाषणात म्हणाले. आगामी शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाविष्ट करणार असल्याचेही सावंत म्हणाले.