मुंबई - १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज ड्रीम ट्रॅव्हलकर आणि वरळीमधील न्यू गोल्डन क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने वरळी येथे शिवरायांचा इतिहास आणि त्यांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांच्या चित्ररूपी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत सुरू राहील.
लोकांना महाराजांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी ड्रीम ट्रॅव्हलकर इंटरनॅशनल आणि नॅशनल ट्रॅव्हल्स वरळी यांनी या चित्ररूपी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तसेच आपल्या पावसाळी टूर्स आणि ट्रेकिंगमधून जो नफा मिळेल तोही महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दुर्गांचा प्रवास दुर्गांसाठी हे त्यांचे ब्रीद आहे.
या कार्यात तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी मावळा या नवीन वेबसाईटवर संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली जाईल व त्यांना या उपक्रमात सामावून घेतले जाईल.
शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्ररुपी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. तसेच महाराष्ट्र दिनाची अनेकांना सुट्टी असल्याने या चित्र रुपी प्रदर्शनाचा लोक आंनद घेत आहेत.