मुंबई : शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याप्रकणी आधी झालेल्या सुनावणीत खरी शिवसेना कोणाची, याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज सुनावणी देणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे.
आयोगाने चिन्ह गोठवले : ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या सुनावणीच्या आदेशात आयोगाने दोन्ही गटांना पक्षाचे नाव किंवा त्याचे धनुष्यबाण' चिन्ह हे वापरण्यास मनाई केली होती. दरम्यान, ठाकरे गटासाठी पक्षाचे नाव म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले.
पक्षाच्या दाव्यासाठी वाद निवडणुक आयोगात : वादाचा अंतिम निर्णय होईपर्यंत अंतरिम आदेश सुरू राहील, असे आयोगाने म्हटले होते. शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांचा आणि लोकसभेतील 18 पैकी 12 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा करत शिंदे यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केले होते. ठाकरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले. निवडणूक चिन्ह आदेशाच्या पॅरा 15 मध्ये विभाग किंवा गटांच्या प्रतिनिधींना ऐकण्याची इच्छा म्हणून सुनावणी करण्याची तरतूद आहे.
पक्षचिन्हाच्या सुनावणीत आतापर्यंत काय झाले? : या आधी 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले होते. सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा अशी विनंती केली, पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असे आयोगाने म्हटले होते.त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी युक्तिवाद पूर्ण केले आहेत. ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, सादिक अली केसनुसार अशा वादावर निर्णयासाठी निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे हे शिंदे गटाने सांगितले होते.
राजकीय वर्तुळात चर्चा : 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. शिवसेनेतल्या या अभूतपूर्व बंडानंतरची ही पहिली जयंती. त्याचवेळी निवडणूक आयोगातली लढाईही शिगेला पोहोचलेली असेल. सुनावणी पूर्ण झाली तर आयोग निकाल राखून ठेवून नंतरही जाहीर करु शकते. त्यामुळे या अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला असणार आणि तो सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीआधीचाच असणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.