मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या शिवसंवाद यात्रेला उत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गट भाजप युतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात आज घाटकोपर येथून झाली. जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप, शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला घाटकोपर पश्चिम अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जोरदार सुरूवात झाली. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत यात्रेची सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजपा - शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे.
जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेत जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन भाजपा - शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले. यात्रा मुलुंड बाळराजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. यावेळी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, 'भाजप आणि शिवसेना सोबत असून धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, तसा आनंद जनतेलाही आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा आहे.' असेही ते म्हणाले. यावेळी आ. राम कदम, आ. मिहीर कोटेचा, आ. पराग शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसंवादला, आशीर्वादाने उत्तर : तत्कालीन पर्यटन मंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेची घोषणा केल्यानंतर भाजपकडून आशीर्वाद यात्रेची घोषणा करण्यात आली. शिवसंवाद यात्रेतून शिंदे गट, भाजप यांच्यावर निशाणा साधला जाणार आहे. तर त्याला आशीर्वाद यात्रेतून उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आजपासून सुरू झालेली आशीर्वाद यात्रा होणार असून यापुढे ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रामध्ये आशीर्वाद यात्रा मार्गक्रमण करणार आहे.
हेही वाचा - NCP Criticized AIMIM : 'एमआयएम'च्या आंदोलनात औरंगजेबचे पोस्टर झळकवण्यामागे भाजप; राष्ट्रवादीचा आरोप