मुंबई - बिहारमधील राज्यकर्ता पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला जातो. त्यानंतरही विजयाचा आनंद साजरा केला जातो, हा सर्वात मोठा विनोद असल्याची टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठ्या घडामोडी होतील, असे भाकीतही राऊत यांनी व्यक्त केले आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकार स्थिर याची शाश्वती नाही -
यावेळी बोलताना भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बिहारमध्ये बहुमतासाठी 123 जागा लागतात. एनडीएकडे 125 चे बहुमत आहे. एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. बहुमत हे चंचल असते यामुळे सरकार स्थिर आहे, याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले.
तेजस्वी मॅन ऑफ द मॅच -
बिहार निवडणुकीमुळे देशाला तरुण नेता मिळाला आहे. तेजस्वी यादवने चांगला मुकाबला केला. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा पराभव झाला असला तरी तो मॅन ऑफ द मॅच ठरला असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तेजस्वी भरपूर काही देऊ शकेल, असेही राऊत म्हणाले. लढणाऱ्या नेत्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. मोदी, शाह, नड्डा यांनी तेजस्वीची पाठ थोपटली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
शिवसेनेचे आभार मानावे -
बिहार निवडणुकीत सत्ताधारी असलेला पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यानंतरही नितीश कुमार यांना भाजपाने मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला आहे. महाराष्ट्रात भाजपाने शब्द फिरवल्याने शिवसेनेने नवे राजकीय समीकरण करून सत्ता स्थापन केली. याचा अनुभव असल्याने भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला आहे. त्यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.
तर भूतल हलेल -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना गिरे तो भी टांग उपर, अशी टीका केली आहे. यावर बोलताना फडणवीस राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी बिहार निवडणुकीत प्रचार केला आहे. ते आजारी असले तरी रुग्णालयातून काम करत असावेत, असा टोला लगावत आम्ही जर टांग वर केली तर सर्व भूतल हलेल असे राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी -
बिहारमध्ये बहुमताचा आकडा कधीही मागे पुढे होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी होतील, असे राऊत यांनी म्हटले आहे. आशिष शेलारांना टीका करण्याचा अधिकार आहे. नितीश कुमार यांचे पंख कापण्यासाठी चिराग पासवान यांना उभे केले असावे, अशी शक्यता राऊत यांनी व्यक्त केली.