मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत कोणी बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. आमचे सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, असे टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विरोधकांना लगावला आहे. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राऊत यांनी ट्विट करत हा टोला लगावला आहे.
संजय राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (सोमवार) संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.'
सोमवारी शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. पवार आणि पटेल यांच्या भेटीनंतर काही तासातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवन गाठले.
कोश्यारी यांच्याशी भेट घेतल्यानंतर राणे यांनी, मुख्यमंत्री सक्षम नसल्याचे सांगत, राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. राज्य सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरली आहे. दिवसागणिक ही परिस्थिती गंभीर होत आहे. आतापर्यंत १ हजाराहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालये लष्कराच्या ताब्यात देण्यात यावी. ठाकरे सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट वाढलेले असताना, दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार कोरोनामुळे निर्माण झालेले संकट हाताळण्यात अयशस्वी ठरले, असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. अशात राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा - 'ठाकरे' सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंची मागणी
हेही वाचा - ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय - वर्षा गायकवाड