मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी मुंबईतील आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, आज जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. या मोर्चाला महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'हा देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. चर्चेच्या पहिल्या फेरीत जर हा प्रश्न निकाली लागला असता तर पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा वाढली असती. देशाच्या प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांचे आंदोलन सुरू ठेवून त्यांना देशातील वातावरण अशांत ठेवायचे आहे का? असे आता वाटायला लागले आहे.'
देशभरातील शेतकऱ्यांचे हे अभूतपूर्व आंदोलन होत आहे. मुंबईसारख्या शहरात अजूनही कोरोना गेलेला नाही. याची काळजी घेतली तर बरं होईल. नाहीतर यानिमित्ताने पुन्हा नवीन संकट महाराष्ट्रात पसरेल ही चिंता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लागली असल्याचे देखील राऊत म्हणाले.
ममता बॅनर्जीबाबत काय म्हणाले राऊत...
जय श्रीराम बोलायला या देशात कोणाला प्रॉब्लेम नसावा. जय श्रीराम बोलल्यामुळे कोणाचे सेक्युलरिझम संपणार नाही. हा कुठला राजकीय शब्द नाही. हा आमचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, ममता दीदींचीसुद्धा श्रीरामवर आस्था आहे, असे राऊत म्हणाले.
शेतकरी आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला यावर तुमचे मत काय असे विचारले असता, राऊत म्हणाले, 'शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देखील वाटतं की हा प्रश्न सुटावा. परंतु ते आतल्या आत गुदमरले आहेत. त्यांना बोलता येत नाही.'
शेतकरी-पोलीस संघर्ष होण्याची शक्यता
जवळपास 10 हजाराच्यावर शेतकरी आझाद मैदानात जमा झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी राजभवनाच्या दिशेने निघाले तर मुंबईतही ट्रॉफिकची कोंडी होईल. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाऊ शकतो. म्हणून पोलीस शेतकऱ्यांना आझाद मैदानाच्या बाहेर पडू देणार नसल्याची माहिती मिळत आहे. जर शेतकऱ्यांनी आझाद मैदानाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.