मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. सोनिया गांधी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, सोनिया गांधी या युपीएच्या प्रमुख आहेत. आणि महाराष्ट्रात सरकार बनवण्यात देखील त्यांचे योगदान आहे. कोरोनामुळे काही कामे थांबली होती. परंतु ते आता पुन्हा सुरू होतील आणि राज्य सरकार कॉमन मिनिमम कार्यक्रमानुसारच काम करणार आहे. त्यांच्या पत्राचे आम्ही स्वागत करतो.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले. या पत्रात राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र या पत्रावरून आता राजकरण सुरू झाले आहे.
पत्र लिहण्यात काही दबावतंत्र नाही-
महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख शरद पवार आणि काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे योगदान आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर तयार झाले आहे. या अजेंडामध्ये दलित, शोषित या सर्वांसाठी काम करणार या सर्व बाबीचा त्याच्यात समावेश होता. आणि सरकार त्या किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. काही मुद्दे पुढे नाही आले त्याचे कारण कोरोना उद्भवलेली परिस्थिती आहे. पूर्ण प्रशासन आणि सरकार कोरोना लढण्यासाठी काम करत होती. पण आता हळूहळू सरकारची गाडी पटरीवर आली आहे.आणि आता काम सुरू होईल. पत्र लिहण्यात काही दबावतंत्र नाही आहे. कारण ते लोकांच्या हितासाठी पत्र आहे आणि त्याचे स्वागत केले पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले.
आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासाठी पत्र-
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.