मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून आमदारांना व्हीप बजावला जातो. येत्या २७ फेब्रुवारी पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची मान्यता शिंदे गटाला दिल्यानंतर प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता विधानभवनात ही बैठक पार पडेल. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आलेल्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे.
अपात्रतेची टांगती तलवार : शिवसेना चिन्हावर एकूण ५५ आमदार निवडून आले आहेत. तसेच विधान परिषदेचे १२ सदस्य आहेत. यापैकी ४० आमदार शिंदे गटाकडे आहेत. उर्वरित १५ आणि विधान परिषदेचे १२ आमदार ठाकरेंकडे आहेत. या आमदारांना आपल्याकडे खेचून ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे. सर्व आमदारांना यामुळे व्हीप बजावला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार या बैठकीला जाणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
ठाकरेंची कोडी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा निर्णय घेतला असला तरी हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. २१ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप लागू होण्याची शक्यता कमी आहे. एकीकडे न्यायप्रविष्ठ प्रकरण असले तरी शिंदे गटाकडून ठाकरेंची कोंडी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. ठाकरे गटाचे आमदार गळाला लावून ठाकरेंची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे बोलले जाते.
भरत गोगावले कोण आहेत? कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी भरत गोगावले आहेत. सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास त्यांचा आहे. महाडमधील दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. घाटकोपर पूर्वेकडील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांनी तिसरीनंतरचे शिक्षण घेतले. या शाळेत त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले. 1992-93 पासून ते शिवसेनेशी जोडले गेले आहेत.