मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक प्रकरणी ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडी कार्यालयाच्या काही अंतरावर शिवसेना कार्यकर्त्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली. 'शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है' असे म्हणत या कारवाईचा शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.
काय आहे प्रकरण -
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेकडून 95 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यातील जवळपास 1 कोटी 6 लाख रुपये प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते. या एकूण रकमेपैकी 55 लाख रुपये हे दोन टप्प्यात वर्षा राऊत यांना बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. 2010 मध्ये वर्षा राऊत यांना 50 लाख, तर 2011 मध्ये 5 लाख रुपये माधुरी यांच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या पैशाचा वापर दादर पूर्व येथील एक फ्लॅट विकत घेण्यासाठी करण्यात आल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे.