मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत राज्यभर निदर्शने केली. शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांची तुलना गद्दारांशी करत, निषेध नोंदवला होता. एकनाथ शिंदे यांनी त्यानंतर भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. शिंदे गटाच्या बंडखोरीला मंगळवारी वर्ष पूर्ण झाला.
गद्दार दिनाचे आयोजन : त्यामुळे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीने हा दिवस गद्दार दिन साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच राज्यभरात निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गद्दार दिवसाचे आयोजन केले. कायदा आणि सुव्यवस्था यामुळे बिघडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करत पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या. अनेकांना ताब्यात देखील घेतले.
शाखा प्रमुखांना नोटीस : मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे मोठे प्राबल्य आहे. या भागांत शिवसेना शाखांभोवती मोठा बंदोबस्त वाढवला होता. दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईभरात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या ही तैनात केल्या होत्या. अनेक शाखा प्रमुखांना नोटीस बजावत, पोलीस ठाण्यात बोलावून घेत, समज देण्यात आली.
ठाणे शहरात आंदोलन : दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात आंदोलन करण्यात आले. पन्नास खोक्यांची होळी करीत यावेळी गद्दार दिन साजरा केला. कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या बंडखोरीचा निषेध नोंदवला. दरम्यान, पोलीसांनी पदाधिकाऱ्यांना अटक केल्याने वाद चिघळला.