मुंबई: एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह सुरतमध्ये जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. एकाच वेळी ४० आमदार कमी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे बहुमत कमी झाले. परिणामी आघाडी सरकार कोसळले. शिंदेंच्या बंडाविरोधात ठाकरेंनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.
संजय राऊतांची धमकी? - निवडणूक आयोगापुढे ठाकरे विरूद्ध शिंदे गट आणि शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. अशात आज (30 जानेवारी) लेखी युक्तिवाद दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात लेखी दाखल केला आहे. या सगळ्यात लेखी युक्तिवादात संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाने मोठा आरोप केला आहे. निवडणूक आयोगात आता पुढे काय होणार? पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. संजय राऊत यांच्या धमकीमुळे आमदार पळून गेले, असा दावा शिंदे गटाने केला आहे. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली आहे. याची अधिकृत माहिती अजून बाहेर आली नाही.
दावे-प्रतिदावे सुरू: भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत शिवसेनेचे उट्टे काढले. राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, शिंदेंनी थेट शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. पुन्हा हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने काही दिवसांच्या सुनावणीनंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपावले आहे. सध्या शिवसेना कोणाची? यावर आयोगापुढे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत.
लेखी मुद्दे मांडण्याचा शेवटचा दिवस: शुक्रवारी २० जानेवारीला झालेल्या सुनावणी दरम्यान, शिवसेनेची मूळ प्रतिनिधी सभा ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच असल्याचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगासमोर केला. तसेच शिंदे गटाने घेतलेली प्रतिनिधी सभा घटनाबाह्य असून मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त कशी करता येईल, असाही प्रश्नही ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला. शिंदे गटाकडून यावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
लेखी मुद्दे मांडण्याचे आदेश: लोकसभा आणि विधानसभा सदस्यांची संख्या पाहता पक्षाचे चिन्ह आम्हालाच मिळायला हवे, असा दावा शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी यांनी केला. पक्षाची प्रतिनिधी सभा नाही तर लोकप्रतिनिधी सभा महत्त्वाची असते, असेही त्यांनी युक्तिवादात म्हटले. मुख्य नेतापद हे कायदेशीरच असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ३० जानेवारीपर्यंत लेखी मुद्दे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
आज फैसला: शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर आज लेखी मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे तोंडी आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी थांबणार आहेत. लेखी मुद्दे मांडण्याचा आज दोन्ही बाजूंसाठी शेवटचा दिवस असणार आहे. आज ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात कोणते मुद्दे मांडले जाणार? कोणाला चिन्ह आणि पक्ष मिळेल यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.