मुंबई : अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिवसेनेचा पक्ष निधी आणि मालमत्ता शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळावी, असे म्हटले आहे. मात्र या याचिकेशी आपला काहीही संबंध नसून आपल्याला त्या मालमत्तेशी काहीही देणे घेणे नाही, असे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असलेली शिवसेनेची सर्व मालमत्ता आणि शिवसेनेचा पक्ष निधी हा शिंदे गटाकडे सुपूर्द करण्यात यावा यासाठी अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका राज्यात चर्चेचा विषय बनली असून शिंदे गटाने आता शिवसेनेचे नाव व पक्ष चिन्हासह मालमत्तेवरही दावा केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात शिंदे गटाने मात्र या याचिकेशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
'याचिकेशी काहीही संबंध नाही' : या प्रकरणी बोलताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपला या याचिकेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. अॅडव्होकेट गिरी यांनी दाखल केलेली याचिकेशी आमचा संबंध नाही, कदाचित महाविकास आघाडीतील कोणीतरी जाणून बुजून अशा पद्धतीची याचिका दाखल केली असावी, असा मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.
'आम्हाला शिवसेनेची मालमत्ता नको' : ते पुढे म्हणाले की, आम्ही सुरुवातीलाच शिवसेनेचा पक्षनिधी अथवा त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेवर दावा सांगणार नाही हे स्पष्ट केले होते. त्यांच्याकडे असलेल्या पक्षनिधी त्यांनी कुठे कसा खर्च केला याबाबत आम्हाला काहीही विचारायचे नाही. तसेच त्यांच्या ताब्यात असलेली मालमत्ताही आम्हाला नको, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा पद्धतीची जरी याचिका दाखल झाली असली तरी तिच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.