मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच गेल्या आठवड्यात त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली आहे. या प्रकरणानंतर अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यात काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. शिल्पा शेट्टीने पत्र लिहून आपले स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी मी अद्याप कोणतीही टिप्पणी केली नाही, असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.
शिल्पा शेट्टीने लिहिलेल्या पत्रात काय?
''हो. मागील काही दिवस प्रत्येक स्तरावर फार संघर्षमय आहेत. खूप अफवा पसरल्या आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी आणि हितचिंतकांनी माझ्यावर बर्याच अनावश्यक आकांक्षा टाकल्या. मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही ट्रोल करण्यात आले.
मी अद्याप काहाही टिप्पणी केली नाही, ही माझी भूमिका आहे. आणि मी तसेच करणार आहे. कारण ते कायद्याच्या चौकटीत आहे. म्हणून कृपया माझ्यावतीने भूमिका जाहीर करणे बंद करा.
सेलिब्रेटी म्हणून मी माझ्या विचारधारेचा पुनरुच्चार करते, कधीही तक्रार करू नका, कधीही स्पष्टीकरण देऊ नका, मी फक्त एवढेच म्हणेन. कारण, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.'
एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. मात्र, तोपर्यंत मी तुम्हाला नम्र विनंती करते. विशेषत: एक आई म्हणून आमच्या मुलांसाठी आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि कोणत्याही बातमीची सत्यता पडताळून पाहण्याशिवाय त्यावर टिप्पणी करू नका, अशी विनंती करते.
मी अभिमानाने कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक आहे आणि गेल्या 29 वर्षांपासून मेहनती व्यावसायिक आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणालाही निराश केले नाही.
त्यासाठी हे महत्त्वाचे आहे की, माझा परिवार आणि माझा गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करा, अशी विनंती करते. आम्ही मीडिया ट्रायलला पात्र नाही. कायद्याला त्याचे काम करू द्या. सत्यमेव जयते! सकारात्मकता आणि कृतज्ञतेसह.''
- शिल्पा शेट्टी कुंद्रा
- काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
- अशी झाली होती अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रयान थारप याला या प्रकरणात अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
- फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -
राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.