मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची केस गळा दाबून संपवण्यात व्यवस्थेला यश आले असल्याचा आरोप अभिनेते शेखर सुमन यांनी केला आहे. एकामागून एक ट्विट्स टाकून त्यांनी या प्रकरणाबाबत आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. यापूर्वी देखील दिल्लीतील एम्सने सुशांतसिंहचा मृत्यू हा आत्महत्या केल्यानेच झाल्याचा खुलासा केल्यानंतर त्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती.
'सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण देखील गळा घोटून संपवण्यात आले आहे,' असे ट्विट अभिनेता शेखर सुमन यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटला जस्टिस फॉर सुशांतमध्ये सहभागी झालेल्या त्याच्या चाहत्यांनी उचलून धरले असून अवघ्या काही तासांत या ट्विटला साडेनऊ हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.”
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर सुशांतचे हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. याबद्दल शेखर सुमन यांनी लिहिले की, “रियाला अखेर जामीन मंजूर झाला, सीबीआय आणि एम्सच्या रिपोर्टमध्ये कोणतीही विसंगती नव्हती, मिरांडा आणि दिपेश यांनाही जामीन मंजूर झाला. दुसरी फॉरेन्सिक टीम शेवटपर्यंत स्थापन करण्यात आली नाही, दी एंड.. घर चले..? हत्येची शक्यता आता इथेच सुशांतसोबत संपवून टाकूयात. सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली..!”
एम्सने सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असल्याचे निदान केल्यानंतर देखील शेखर यांनी अनेक ट्विट्स करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले होते, “अखेर एम्सचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मला वाटलेच होते की, असेच काहीतरी होणार आहे. मी बरेच दिवस आधी तुम्हाला सूचित केले होते की, हे प्रकरण हायजॅक करण्यात आलेले आहे. त्याला फाटे फोडण्यात आले आहेत, त्यातील सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सत्य लपवून असत्य रेटण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपण सगळे मात्र सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने, कुणालाही न घाबरता, कुणाची पर्वा न करता लढत आहोत. दुर्दैवाने हे प्रकरण अनेक यंत्रणांनी हाताळले, त्यांच्या तपासात अनेक त्रुटी राहिल्या, काही माध्यमांनी ही केस आपल्या फायद्यासाठी हवी तशी वापरून घेतली. आपण मात्र आता तरी त्याला न्याय मिळेल या एकाच आशेवर टिकून राहिलो”
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतरच शेखर सुमन यांनी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती. १४ जून रोजी त्यांनी पाटणा येथे जाऊन सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली होती. यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. मात्र, अखेर या प्रकरणात सुशांतने आत्महत्याच केल्याचे दावे पुढे आल्याने व्यथित होऊन त्यांनी आज ही ट्विट्स करून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
हेही वाचा - सुशांतचा मृत्यू राष्ट्रीय मुद्दा नाही - अनूप जलोटा