मुंबई : Shasan Aplya Dar : 'शासन आपल्या दारी' या सरकारच्या कार्यक्रमांतर्गत राज्यातील जनतेच्या पैशाची प्रचंड उधळण होत असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमावर सरकारच्या वतीनं आयोजनासाठी 60 लाख ते 81 लाख रुपये खर्च केले जातात. त्यामुळं पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता.
राज्यातील महायुती सरकारला जनतेचा मिळणारा पाठिंबा आणि प्रतिसाद हा प्रचंड प्रमाणात आहे. या सरकारनं सुरू केलेल्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय. लोकांच्या समस्या तात्काळ सुटत असल्यानं लोक या कार्यक्रमासाठी आग्रही आहेत. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहून लोकांच्या समस्यांचं निराकरण करतात. त्यामुळं या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहूनच विरोधकांच्या पोटात गोळा उठत आहे. राज्य सरकारला मिळणारा हा प्रतिसाद विरोधकांच्या उरात धडकी बनवणारा आहे. म्हणूनच अशा पद्धतीची टीका केली जाते - किरण पावसकर, प्रवक्ते, शिवसेना (शिंदे गट)
कोळी बांधवांना नुकसान भरपाई दिली : मुंबईतील कोस्टल रोडमुळं वरळी कोळीवाड्यातील अनेक मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन रोजी रोटीवर परिणाम झालाय. हे राज्य शासनाला (Shinde Fadnavis Government) मान्य आहे. या बांधवांना या संदर्भात नुकसान भरपाई मिळणं अपेक्षितच होतं. मात्र, हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. 2018 पासून हे कोळी बांधव आपल्या नुकसान भरपाईसाठी झगडत होते. मात्र, या मतदारसंघातील आमदारांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत केली नाही. वास्तविक या कोळी बांधवांना मदत देणं हे गरजेचं होतं, असंही किरण पावसकर म्हणाले.
जनतेच्या प्रश्नांवर काम करणारे सरकार : घटनाबाह्य सरकार असा आरोप करणाऱ्यांनी कधीही या लोकांचा विचार केला नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या कोळी बांधवांच्या समस्येचा विचार करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात या परिसरातील 170 कोळी बांधवांना नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलं असून, त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट पाठवण्यात आली आहे. ही मदत एक लाख ते 19 लाखांपर्यंत आहे. यामुळं कोळी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हे सरकार जनतेच्या प्रश्नांवर काम करणारे सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होतं, असेही पावस्कर यावेळी म्हणाले.
हेही वाचा -