मुंबई - आझाद मैदान येथे शनिवारी (1 फेब्रुवारी) विद्यार्थी व एलजीबीटी समुदायाच्या संघटनांनी दिल्लीतील शाहीनबाग येथील गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या शरजील इमाम याच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी भाजपने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात उर्वशी चुडावालासह 50 ते 60 जणांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी उर्वशी चुडावाला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव समोर येत आहे. उर्वशी ही एमए (मीडिया) ची विद्यार्थिनी आहे. तसेच ती 'टीस क्वीर कलेक्टीव' या लैंगिक भेदभाव विरोधात काम करणाऱ्या संस्थेतदेखील काम करते. आरोपींवर कलम 124 अ (देशद्रोह), 153 ब (राष्ट्रीय अखंडतेचा पूर्वग्रह) आणि कलम 505 (सार्वजनिक गैरवर्तन विधान) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शनिवारी समलैंगिक परेडमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. क्विर आझादी चळवळीच्या (क्यूएएम) संयोजकांनी पोलिसांना सांगितले की, आमच्या गटातील लोक अशा घोषणा देतील याबद्दल आम्हाला माहीत नव्हते. आयोजकांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत मुंबईत हे काय चाललंय? असा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, आसाम भारतापासून वेगळे करु आणि जिथे जिथे मुस्लिम समुदाय आहे तिथे चक्काजाम करु असे वादग्रस्त वक्तव्य शरजील इमाम याने केले होते. त्यानंतर बिहारमधून त्याला अटक करण्यात आली होती.