मुंबई - महात्मा गांधी यांच्याविरोधात ट्विट करून त्यांचा अवमान करणाऱ्या मुंबई महापालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पण, सरकारकडून यासंबंधी पावले उचलली जाताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याविषयीची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पवार यांनी रविवारी सायंकाळी लिहीलेल्या पत्रात थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरुषांच्या बाबतीत शासन दरबारी असणाऱ्या व्यक्तीकडून असा गंभीर प्रमाद घडावा व त्याकडे राज्य शासनाने कानाडोळा करावा ही दुर्दैवी आणि अशोभनीय बाब असल्याचे पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच राज्याचे प्रमुख म्हणून पण अशा अधिकार्यांवर कडक कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही. कारवाई न केल्यास राज्य सरकारची थोर महापुरुषांच्या बाबतीतील नीती आणि नियत अतिशय खालच्या स्तरावर पोहोचली असा समज होईल. असेही पवार यांनी पत्रात नमूद करून मुख्यमंत्र्यांना एक इशाराही दिला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी कार्यरत असणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्ताने एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी भारतीय चलनात असणाऱ्या नोटांवरील महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढून टाकावे. जगभरातील त्यांचे नाव, पुतळे हटवावेत असे विधान केले होते. एवढेच नव्हे तर महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे देखील त्यांनी उदात्तीकरण केले होते. या विषयावरुन वाद ओढवल्यावर त्यांनी ते ट्विट काढून टाकले. तसेच, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे स्पष्टीकरण दिले.