मुंबई Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना भाजपासोबत जायचं असल्यानं त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला. तर दावा करणाऱ्यांनाच भाजपासोबत जायचं असल्यानं, 'ते' असा आरोप करत असल्याचा टोला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांचा राजीनामा खरंच स्टंटबाजी होता काय, यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
छगन भुजबळ यांच्या दाव्याला किती महत्व ? : शरद पवारांच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत पंधरा दिवसाआधीच चर्चा झाली होती. याबाबतचा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. त्यानंतर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचं, असं ठरलं होतं. त्यानंतर मग भाजपासोबत सरकार स्थापन करायचं, असं शरद पवारांच्या घरी ठरलं होतं. म्हणून तर त्यांनी अचानक राजीनामा दिल. ते राजीनामा देणार याची मला कल्पना नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार हे प्रफुल पटेल आणि अजित पवारांना माहिती असणार, असं छगन भुजबळ म्हणाले. मात्र शरद पवार यांनी भुजबळांच्या दाव्याची हवा काढून टाकली आहे. भाजपासोबत न जाण्याची माझी भूमिका कायम होती. तर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा ही छगन भुजबळ यांची मागणी होती. त्यामुळे भुजबळांच्या दाव्याकडं दुर्लक्ष करा, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे आणि भुजबळांच्या बोलण्यात विरोधाभास : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे शरद पवारांवरील आरोप खोडून काढत पलटवार केला आहे. शरद पवार अध्यक्ष असताना अजित पवार परस्पर निर्णय घेत असल्याचं समोर आलं होतं. शरद पवारांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही. या सगळ्यांचा वारंवार भाजपा सोबत जाण्याचा आग्रह होता. त्यामुळेच शरद पवार दुखावले गेले. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी कार्यकर्ते आणि स्वतः छगन भुजबळ यांनी कमिटी वगैरे काही नको, तुम्ही जबाबदारी स्वीकारावी ही विनंती केली होती. अध्यक्षपदासाठी कमिटी स्थापन करा, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र त्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला. मग तुम्ही कसं म्हणू शकतात की शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या बोलण्यात विरोधाभास असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना लागवला आहे.
काँग्रेसचा अजित पवारांवर आरोप : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणातील अनुभवावरून त्यांना राजकारणतील चाणक्य म्हटलं जातं. जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, त्यावेळेस तुम्हीच त्यांच्या पुढं ढसाढसा रडले होते. आता तुम्ही त्यांना सोडून सत्तेसोबत गेला तर शरद पवारांच्या राजीनामाची स्टंटबाजी वाटत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे स्वतःची चामडी वाचवण्यासाठी भाजपच्या दावणीला राहून शरद पवारांना लक्ष्य करण्याचं काम करीत आहे. अजित पवार गटाचे नेते सरड्याप्रमाणं रंग बदलत शरद पवारांवर आरोप करत असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.
अजित पवार गट बॅक फुटवर : मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या खुलाशाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना विश्वासात न घेता दोन वेळा भाजपासोबत जाण्याबाबतचा निर्णय घेतल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. शरद पवारांना न विचारता हा गट वेगळा झाला आहे. याचा दूरगामी परिणाम या पक्षावर होणार आहे. छगन भुजबळांचा हा मुद्दा घेऊन शरद पवार गट निवडणूक आयोगाकडं जाऊ शकतो. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह त्यामुळे निश्चितच मूळ शरद पवारांकडं राहू शकते. सध्या अजित पवार गट बॅक फुटवर जात असल्याचं चित्र असल्याचं मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :