मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेसने गौतम अदानींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरले होते; परंतु शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांची पाठराखण केली होती. तसेच 'जीपीसी' स्थापनेला देखील विरोध केला होता. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील दुरावा वाढल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. खरा प्रश्न दोघातील तणावाचा किंवा दुराव्याचा नसून शरद पवार सत्तेची जुळवाजुळवी करत असल्याचे बोलले जात आहे; त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी राहील की नाही? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
काँग्रेस पक्ष सक्षम? भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडीला बदनाम करण्याची षड्यंत्र रचली जात आहेत. शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा पद्धतीच्या वावड्या भाजपकडून उठवल्या जात आहेत. यावर आताच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची बिघाडी नाही. महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्याचा दुर्दैवी निर्णय झाला तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष सक्षमपणे काम करेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.
भाजपा-राष्ट्रवादी जवळीकीचा फरक नाही: बारसू रिफायनरी प्रकल्प होऊ नये, अशी मानसिकता शरद पवारांची दिसत नाही. राज्याच्या विकासाचे आणि हिताचे काय आहे, हे त्यांना कळते. त्यामुळे बारसू प्रकरण वाढेल अशी कृती त्यांच्याकडून होणार, असे वाटत नाही. राष्ट्रवादी पक्षाची भाजपसोबत जवळीक वाढत असेल तर आम्हाला चिंता करायचे कारण नाही. आमची मविआतील युती ही वैचारिक विचारावर आधारलेली आहे. आमच्याकडे चांगले बहुमत आहे. आमच्या संख्येला कोणीही डावलू शकत नाही अशी माहिती शिवसेना प्रवक्ते (शिंदे गट) संजू भोर पाटील यांनी दिली.
राकॉंची सावध भूमिका: गुंतवणुकीला आमचा विरोध नाही; मात्र तेथे असलेल्या लोकांशी संवाद साधणे खूप गरजेचे आहे. त्या ठिकाणचे व्हिडिओ बघितले तर पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. तेथील लोकांशी संवाद न होता दडपशाही होत आहे. याला मी विरोध करतो. लोकांचे मत आणि त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. संवाद करा आणि मार्ग काढा, गुंतवणूक येणार असेल तर राज्यासाठी चांगली गोष्ट आहे, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.