मुंबई : भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्यात मोठी खळबळ उडून दिली होती. मात्र त्यानंतर केवळ काही तासात राष्ट्रवादी आणि भाजपचे हे सरकार कोसळले. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्यानंतर सरकार स्थापन करने निश्चित झाले होते. मात्र शरद पवारांनी वेळेवर माघार घेऊन आमच्यासोबत डबल गेम केला, मात्र आमच्या पाठित खंजिर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनीच केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला.
उद्धव ठाकरेंनीच खुपसला खंजिर : शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवून यश मिळवले होते. मात्र निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन घेणे पण बंद केले. तत्कालिन शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी बोलणी करत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही पर्याय शोधत होतो. यावेळी राष्ट्रवादीच्या काही जणांनी ते आमच्यासोबत येऊ शकतात, असे स्पष्ट केल्याने आमच्या शरद पवार यांच्यासोबत बैठकी झाल्या. मात्र एकत्र निवडणूक लढवूनही उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पाठित खंजिर खुपसला. देवेंद्र फडणवीस यांच्या या नव्या दाव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवारांनी केला डबल गेम : उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केल्यावर आम्ही पर्याय शोधत होतो. तेव्हा राष्ट्रवादी आमच्यासोबत सरकार स्थापन करायला तयार होती. त्यामुळे आमची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी झाली होती. मात्र शरद पवार यांची मिस्ट्री समजून घेण्यासाठी त्यांची हिस्ट्री समजून घेणे गरजेचे आहे. शरद पवार यांनी वेळेवर भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास माघार घेतल्याने अजित पवारांना आमच्यासोबत येण्यावाचून पर्याय उरला नाही. मात्र शरद पवार यांनी डबल गेम खेळला आणि माघार घेतल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शरद पवारांनी फक्त वापर केला : सरकार स्थापन करण्यासाठी अगोदर शरद पवार तयार होते. मात्र त्यांनी माघार घेतली. त्यामुळे शरद पवारांनीही तुमच्या पाठित खंजिर खुपसला का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. शरद पवार यांनी आमचा फक्त वापर केला, त्यांनी खंजिर खुपसला नाही. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या नव्हत्या, त्यांनी फक्त सोबत सरकरा स्थापन करण्याची बोलणी करुन माघार घेतली. मात्र शिवसेनेने आमच्यासोबत निवडणुका लढवून यश मिळवले होते. त्यामुळे खंजिर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -