मुंबई : Sharad Pawar On BJP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय समोरील जे एन हेरेडिया मार्गावरील राष्ट्रवादी भवन येथे सभा झाली. सभा सुरू होण्यापूर्वी मुंबई विभागाची बैठक पार पडली आणि एकमताने राखी जाधव यांची मुंबई शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईच्या मेळाव्यातून केंद्रातील भाजप, आणि राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. त्यासोबत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. देशात दिवसेंदिवस भाजपा कमी होत चालला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात भाजपासोबत जाणाऱ्यासोबत लोक नाहीत. अनेक राज्यात भाजपा नाही. तसेच आगामी निवडणुकीत हे स्पष्ट होईलच. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचा असतो. मात्र सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. सामान्य माणसाला शक्ती देणारे निर्णय सरकारने घेतले पाहिजेत; परंतु केंद्रातील सरकार ते घेताना दिसत नाही, असे ते म्हणाले.
सरकार बदलावे लागेल : कंत्राटी नोकर भरतीवरून शरद पवार यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे. ही पद्धत घातक ठरू शकते, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला. कंत्राटी पद्धतीने भरती केल्यानंतर 11 महिन्यानंतर नोकरी मिळालेल्या व्यक्तीने काय करायचे असा प्रश्न देखील त्यांनी सरकारला विचारला आहे. पोलीस भरती प्रक्रिया देखील 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर केली जाणार असून अशा प्रकारची भरती प्रक्रिया कोणत्याही सरकारने केली नाही. भाजप सरकार चुकीचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केलं.
'त्यांनी' आपल्याला दोन न्यायालयात नेले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी देखील आपल्या पक्षाच्या अध्यक्षाची निवड केली. त्यांनी आपल्याला सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर नेले. या लोकांमुळे आपल्या खऱ्या राष्ट्रवादी पक्षाला संघर्ष करण्याची वेळ आली आहे. निर्णय येईल तेव्हा सामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. न्यायालीन आणि निवडणूक आयोगासमोर लढाईत निष्णात वकील लढा देत आहेत.
हेही वाचा: