मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता शरद पवारांमध्ये आहे, असे म्हटलं. पवारांकडे दीर्घ अनुभव आहे. भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल, हे मी सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रयोग देशस्तरावर देखील झाला पाहिजे. आम्ही विरोधकांना टक्कर देऊन राज्य चालवत आहोत, असेही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर व्हावा, अशी विरोधकांची इच्छा आहे. महाराष्ट्रात प्रयोग झाल्याने अनेकांना तशी अपेक्षा आहे, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी?
काँग्रेस आणि यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावे यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सोनिया गांधी यांच्यानंतर शरद पवार लवकरच यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात अशी माहिती समोर येत आहे. राहुल गांधी हे यूपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती यूपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल, असेही बोललं जात आहे. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. कृषी कायदे रद्द करावे, यासाठी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार प्रतिनिधी मंडळामध्ये होते.
राहुल गांधींमध्ये सातत्याची कमतरता -
सध्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून अंतर्गत वाद सुरू आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी पत्र लिहले होते. त्यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी राहुल हेच पक्ष नेतृत्वासाठी योग्य असल्याचा दावा केला होता. मात्र, त्याला पक्षातील इतर नेत्यांनी सहमती दर्शवली नव्हती. पक्षाला पूर्णवेळ देणारा अध्यक्ष असावा, असे मत नेत्यांनी व्यक्त केले होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली असून राहुल गांधींची बाजू मांडण्यासाठी एखादे कणखर नेतृत्व नाही. तसेच गेल्या आठवड्यामध्ये शरद पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थितीत केले होते. देशाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे सातत्याची कमतरता असल्याचे मत त्यांनी मांडले होते.