मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मी स्वत:च येतोय म्हणून सांगितले होते. आमची भेट अचानक ठरली असली तरी आमची राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मजबूत आहे. सरकारला कोणताही धोका नाही. पुढची पाच वर्ष हे सरकार असेच टिकून राहील, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.
पवारांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच रात्री मुख्यमंत्र्यांसोबत पवारांनी घेतलेल्या गुप्त बैठकीमुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी राज्यात सरकार मजबूत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून ते कोणते राजकीय भाष्य करतात, याकडे लक्ष लागले आहे.
राज्यपालांनी आपल्याला चहापानासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. त्यावरूनच काल(सोमवारी) मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होते, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.