मुंबई Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा मंगळवारी वाढदिवस आहे. यावर्षी शरद पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताही जल्लोष न करण्याचं आवाहन देखील केलं आहे. याविषयाची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आज जाणार का, याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन वेळा केंद्रीय मंत्री : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. त्यासह शरद पवार हे दोन वेळा केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री होते. पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री होते. तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडं कृषी मंत्रालयाची जबाबदारी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार हे काम करतात. त्यांच्याच नेतृत्वात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात सत्ता स्थापन केली होती.
शरद पवारांची क्रिकेटमध्येही 'खेळी' : राजकारणात शरद पवार यांना 'चाणक्य' म्हणून ओळखलं जाते. शरद पवारांचं राजकारण अद्याप कोणालाही समजलं नसल्याचं राजकारणात बोललं जाते. राजकारणासारखंच शरद पवार विविध संघटनांशी संबंधित आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी 2005 ते 2008 या कालावधित शरद पवार यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केलंं आहे. शरद पवार हे 2010 ते 2012 या कालावधित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
राजकारणातील 'तेल लावलेले पैलवान' : शरद पवार यांना राजकारणातील 'चाणक्य' आणि 'तेल लावलेले पैलवान' अशा उपाध्या लावल्या जातात. शरद पवार यांनी राजकारणात अनेक नेत्यांवर मात केली आहे. आतापर्यंत शरद पवार हे कोणत्याच आरोपात अडकले नाहीत. कोणत्याही पक्षांच्या राजकीय खेळीला मात देऊन ते राजकारण करतात. त्यामुळे त्यांना 'तेल लावलेले पैलवान' असं संबोधलं जाते. मात्र शरद पवार हे कोणत्याच भूमीकेवर ठाम राहत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो.
शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना : देशाच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 साली झाला. दरवर्षी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. मात्र यावर्षी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. शरद पवार यांनी स्वतः पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारचे बॅनर अथवा फलक लावू नये, अशा सूचना केल्या आहेत.
शरद पवार वाढदिवस साजरा करणार नाहीत : "महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीमुळं झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान, दुष्काळ आरक्षणाचे विविध प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. त्यामुळं शरद पवार आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत" अशी माहिती, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. "शरद पवार नागपूरलाच असणार आहेत. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मात्र शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शरद पवार कोणाचीही भेट घेणार नाहीत", अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
काकांची भेट घेणार का पुतण्या : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवारांचा हा पहिला वाढदिवस आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरला सुरू असल्यानं अजित पवार गटाचे सर्व मंत्री, आमदार नागपुरात आहेत. दुसरीकडं युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार नागपूर इथं पोहचले आहेत. राजकारण आणि राजकीय भूमिका एका बाजुला तर कौटुंबिक नातं दुसऱ्या बाजुला अशा प्रकारची संस्कृती पवार कुटुंबाची असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळं शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकारण बाजुला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे सहकारी मंत्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणार का, याकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :