मुंबई - कर्नाटक राज्यात शहाजी राजे भोसले यांची समाधी असून तेथे महाराष्ट्र शासनामार्फत पुतळा उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्यानुसार कर्नाटकात राजेंचा पुतळा उभारण्यासाठी पुरातत्व विभागाकडून जागेची पाहणीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुतळ्यासाठी जागा पाहणीचे दिले होते निर्देश -
गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने यासाठी सुध्दा प्रयत्न करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनांसंदर्भात नुकताच आढावा घेण्यात आला. कर्नाटकात शहाजी राजेंचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी करण्याचे निर्देश मंत्री देशमुख यांनी पुरातत्व संचालकांना यावेळी दिले होते.
शहाजी राजेंचा पुतळा उभारण्यासाठी जागेचा शोध -
महाराष्ट्राचे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे. याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे. या समितीने कोरोना काळात दोन बैठका घेतल्या. नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्नाटकात शहाजी राजेंचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी केली जात असल्याचे पुरातत्व संचालकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना -
मुंबईसह महाराष्ट्रातील किल्ल्याचे जतन, संवर्धन करण्याकरिता येत्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले यावेळी उपस्थित होते.