मुंबई - राज्यात भूमिहीन मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी जमिनी आणि त्यावर शेड बांधून मिळणार आहे. यासाठीचा शासन निर्णय लवकरच काढला जाणार असून यामुळे आत्तापर्यंत भटकंती करणाऱ्या धनगर समाजाच्या आयुष्यात स्थिर होण्यासाठीच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होईल, अशी माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
धनगर समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून आत्तापर्यंत आठ जीआर काढण्यात आले असून त्यामध्ये शिक्षण, रोजगार, उद्योग आदी विषयांचा समावेश आहे. मात्र, जे मेंढपाळ आणि धनगर समाजाचे लोक पिढ्यान्पिढ्या भटकंती करत असतात, त्यांची भटकंती थांबवून आयुष्यात स्थिरता यावी, यासाठी त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या-मेंढ्यांसाठी सरकारकडून जमिनी देऊन त्या जमिनींवर शेड बांधून देण्याचा शासन निर्णय प्रलंबित राहिला होता. त्यासाठी आपण शुक्रवारी ओबीसी विभागाचे मुख्य सचिव जे.पी.गुप्ता यांची भेट घेऊन त्यावर लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली. त्यावर सचिवांनी प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगत या विषयीची कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे कागदपत्रे पाठवून त्यावर एक-दोन दिवसांमध्ये शासन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले असल्याची माहितीही खासदार महात्मे यांनी दिली.
शेळ्या-मेंढ्यानाही सायंकाळी शेडमध्ये ठेवण्यासाठी व्यवस्था झाली तर भटकंती करणारा समाज आहे तो एका ठिकाणी स्थिरावेल. त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विषय त्यासोबतच मुलांचे शिक्षण यातून मार्गी लागेल. आत्तापर्यंत धनगर समाज भटकत असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. यामुळे राज्यातील भूमिहीन धनगर समाज एका ठिकाणी स्थिर होणे आवश्यक आहे आणि ते महत्त्वाचे होते, असेही ते म्हणाले.
याचप्रमाणे धनगर समाजाला कुक्कुटपालनासाठी सुद्धा जी काही मदत मिळणार आहे. त्याचाही जीआर लवकरच निघणार आहे. तसेच जे 'स्टँड अप इंडिया' स्वयम रोजगार उद्योग निर्मितीसाठी त्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये त्यांच्या विकासासाठी मिळणार आहेत. त्याचा लाभ हा प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी काही अडचण असेल तर मी खासदार म्हणून मला कधीही या समाजातील लोकांनी संपर्क करावे, समाजातील सर्व राजकीय आणि सामाजिक संघटना यांनीही ही मदत सर्वसामान्य धनगर समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. महात्मे यांनी केले.