मुंबई : कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी रस्त्यावर पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कोरोना संक्रमणाचा विळखा राज्य पोलीस दलात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य पोलीस दलात गेल्या 24 तासात 77 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून एका कोरोनाग्रस्त पोलिसाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 60 वर गेला आहे. मृत पोलिसांमध्ये 3 पोलीस अधिकारी व 57 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील पोलीस निरंतर कार्यरत आहेत. कोरोनाने आता पोलीस दलातही शिरकाव केला असून या योद्ध्यांनाही मोठ्या प्रमाणत कोरोनाची लागण होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 77 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1 हजार 15 कोरोनाबधित पोलिसांवर उपचार सुरू असून यात 121 पोलीस अधिकारी तर 894 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 39 हजार 702 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 756 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 290 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 860 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संदर्भात तब्बल 1 लाख 5 हजार 269 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या 1 हजार 335 प्रकरणात 29 हजार 425 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 86 हजार 301 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 9 कोटी 95 लाख 52 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 54 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.