मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, बासित परिहार, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा व जईद विलात्रा यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सत्र न्यायालयामध्ये आरोपींच्या वकिलांकडून जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काल (१० स्पटेंबर) झालेल्या सुनावणी दरम्यान ६ ही आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. यासंदर्भात उद्या निकाल देणार असल्याचे सत्र न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांच्या तर्फे वकील सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद केला. अमली पदार्थ नियंत्रण विभागाने अटक केलेल्या ६ आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर विभागाच्या सरकारी वकिलांनी आरोपींच्या जामीन याचिकेला प्रखर विरोध दर्शवला. हे प्रकरण वाटते तितके सोपे नसून पुढच्या तपासामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील, असे सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी न्यायालयाला सांगितले. केवळ एनडीपीएस कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला नसून या गुन्ह्यात अमली पदार्थांचा व्यावसायिक गोष्टींसाठी वापर झाल्याचेही अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून न्यायालयाला सांगण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या संदर्भात उद्या निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- कंगनाचा बोलविता धनी कोण? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल