मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांच्या आरोग्य संदर्भातील तपासणी करिता ईडीच्या वतीने विशेष पथक स्थापन करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात करण्यात आली होती. या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले असून जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे पथक स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या पथकाला दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहे.
मलिक यांच्या अडचणीत वाढ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या संबंधित मालमत्ते खरेदी गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाच्या परवानगीने नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिक यांच्यावर सुरू असलेल्या उपचारावर ईडीने आक्षेप घेतल्यानंतर यावर विशेष पथक स्थापन करण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे सत्र न्यायालयात केली होती. या अर्जावर न्यायालयाने निर्णय देत जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले असल्यानेनवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
रुग्णालयात उपचार करण्याची विनंती : नवाब मलिक काही महिन्यांपासून मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांची खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली असून सध्या ते उपचार घेत आहेत. मात्र कारागृहातील वास्तव्य टाळण्यासाठी मलिक हे खासगी रुग्णालयात दाखल असल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच मलिक यांची वैद्यकीय स्थिती नेमकी काय आहे हे तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मंडळ स्थापन करण्याची मागणी ईडीने विशेष न्यायालयाकडे केली होती. शुक्रवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर ईडीच्या या अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ईडीची मागणी मान्य केली.
तपास यंत्रणेकडून पुरावे दाखल : ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ईडीने कारवाई करत मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येक वेळी अर्ज फेटाळण्यात आला. आता मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी याचिकेत केला आहे. मागील सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार विशेष सत्र न्यायालयाने ईडीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ईडीच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे.
आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल : मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. तेव्हापासून म्हणजे पाच महिन्यापासून ते कोठडीमध्येच आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
काय आहे आरोप ? नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Nawab Malik: अखेर मलिकांची किडनी तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत होणार, कोर्टाचा निर्णय