मुंबई - कोकणातील हजारो नोकरदार नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे आणि पुण्यासह विविध ठिकाणी वास्तव्याला आहेत. दरवर्षी हे चाकरमानी गणेशोत्सवाला न चुकता आपल्या गावी जातात. यंदा मात्र करोनामुळे जायला मिळणार की नाही? अशी त्यांना शंका होती. मात्र, सरकारने लॉकडाऊन व प्रवासाचे काही नियम शिथिल करत, चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आता चाकरमानी गावी जाण्यासाठी तयारी करत आहेत. चाकरमान्यांचा घरी कशाप्रकारे लगबग सुरू आहे याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...
गावी जाण्यासाठी सर्व चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. शासनाने शहरात असलेल्या चाकरमान्यांना गावी येण्या-जाण्यासाठी एसटीची व्यवस्था केली आहे. ईपास लवकर देण्यात यावेत यासाठी देखील प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच गावकऱ्यांनीही काही नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे आता चाकरमानी आनंदित झाले आहेत. काहींनी ईपाससाठी अर्ज केला आहे. तर काही पास येण्याअगोदरच गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.
कोकणातील चाकरमानी मनीष भुवड यांच्या कुटुंबीयांनी देखील गावी जाण्यासाठी सर्व तयारी केली आहे. ते खासगी वाहनाने जाणार असल्यामुळे त्यांनी ईपाससाठी अर्ज केला आहे. एसटीने जायचे म्हटले तर त्यांच्याकडे त्या प्रमाणात ग्रुप बुकिंगसाठी लोक नाहीत. त्यामुळे त्यांनी खासगी वाहनाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेले चाळीस वर्ष ते न चुकता गणपतीसाठी गावी जातात. यंदा कोरोनाच्या सावटामुळे त्यांना गावी जायला मिळेल की नाही, याची शंका होती. मात्र, सरकारने गावी जाण्यासाठी परवानगी दिल्याने आता त्यांना गावी जाता येणार आहे. त्यामुळे त्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.