मुंबई - शहरातील रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या तरुणींना आणि महिलांना गाठून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी रस्त्याने जाणाऱ्या महिलांचा विनयभंग करून फरार होत होता. या आरोपीचे काही गुन्हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याच्या आधारे पोलिसांनी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कल्पेश देवधर असे आहे.
विनयभंग करून फरार व्हायचा-
आरोपी हा महागडी दुचाकीवरून रस्त्यावर फेरफटका मारतो, त्यावेळी रस्त्यावर एखादी एकटी महिला अथवा तरुणी आढळल्यास जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. समोरच्या महिलेने जरी बोलण्यास नकार दिला तरी जबरदस्ती जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग तिचा विनयभंग करून फरार व्हायचा. या आरोपीवर असे अनेक गुन्हे दाखल आहेत. अखेर दिंडोशी पोलिसांनी महत्वाची कारवाई करत याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीच्या नावावर १३ गुन्हे-
कल्पेश पेशाने चालक म्हणून काम करतो. पण फावल्या वेळात महिलांची छेड काढण्यासारखा गंभीर गुन्हे तो करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस देवधरच्या मागावर होते. दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर कांदिवलीतल्या चारकोप परिसरातून त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर 13 गुन्हे उघड झाले आहेत. पंतनगर, बांगुरनगर, कुर्ला आणि इतर पोलीस ठाण्यात, असे गुन्हे आहेत. या प्रकरणी आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसकाडून तपास केला जात आहे. यासाठी न्यायालयाने आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईतल्या रस्त्यांवर ती दिवसाढवळ्या महिलांची छेड काढली जात असेल तर करायचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी कडक कायदा येणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.