हैदराबाद - महात्मा गांधी हे नाव हा विचार अत्यंत व्यापक अथांग आहे. गांधीजींच्या जीवनावर आजपर्यंत शेकडो पुस्तकं, रचना झाल्या. मात्र, यापैकी एक अत्यंत महत्त्वाची रचना जी झाली जिने इतिहास रचला ती 1982 मध्ये आलेला गांधी चित्रपट. ( Gandhi Movie ) गांधीजींच्या जीवनात ज्यांनी सावली बनून साथ दिली त्या कस्तुरबांची भूमिका या गांधी चित्रपटात ज्यांनी साकारली त्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगणी. ( Rohini Hattangadi in Gandhi Movie ) महात्मा गांधींची पुण्यतिथीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rohini Hattangadi ETV Bharat Interview on Gandhi Death Anniversary ) या मुलाखती दरम्यान त्यांनी गांधी चित्रपटासाठी कस्तुरबा गांधी यांची भूमिका कशी मिळाली, त्यांना त्यानंतर काय तयारी करावी लागली, कस्तुरबा गांधी यांच्याबद्दलचा त्यांचा अभ्यास यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. गांधीजींच्या आयुष्यातील कस्तुरबा आणि कस्तुरजींच्या आयुष्यातील गांधी या स्मृतींना त्यांनी उजाळा दिल्या.
प्रश्न - 28 वर्षांची तरुणी जी थिएटर करत होती. तिला इतकी मोठी संधी कशी मिळाली? या अनुभवाबद्दल सांगाल.
उत्तर - आकाशातून माझ्या ओंजळीत ही भूमिका पडली, असं मला वाटतं. मी थिएटर करत होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आलेल्या आमच्या मित्रमंडळींचा एक गृप होता. त्या माध्यमातून आम्ही काम करत होतो. या गृपमधील डॉली ठाकूरने मला पाहिलं होतं. सर रिचर्ड अॅटनबरो यांच्याबरोबर सर्वांना भेटवण्याचं काम ती करत होती. यासारखंच तिने मला सांगितलं की, मुंबईमध्ये सर रिचर्ड अॅटनबरो येणार आहेत, तु येऊन भेट. मी त्यांना भेटले. तासभर आम्ही थिएटरबद्दलच गप्पा केल्या. यानंतर मी परत आले. दुसऱ्याच दिवशी डॉलीचा मला टेलिग्राम आला. मला परत फोन कर. तिने सांगितले की माझी निवड झाली आहे. इंग्लंडला जाऊन स्क्रिन टेस्ट द्यायची आहे. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. मग ती मला फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनकडे घेऊन गेली. त्यांचंही सहकार्य होतं. त्यामुळे सहा महिन्यांसाठी मला पहिला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर मी आठ दिवसात इग्लंडला गेले.
तिथे आम्हाला जाण्यापूर्वी एक सीन दिला होता. ते फिल्म करणार होते. तो सीन चित्रपटात जसा असतो तसा करणार होते. त्यामुळे मग मला तयारी करुन जावे लागले. पेहराव तसा करावा लागला. खादी साडी, मंगळसूत्र घेतले. तिथे गेल्यावर बेन किंग्सले यांच्यासोबत मला सीन करावा लागणार होता. तसेच तिथे गेल्यावर मला कळले आणखी दोन गांधी आणि दोन कस्तुरबा होत्या. जॉन हर्ट आणि भक्ती बर्वे तसेच नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील, मी आणि बेन किंग्स्ले अशा जोड्या त्यांनी लावल्या होत्या. मी पहिल्यांदा भारत सोडत होते. दबाव होता.
तिथे गेल्यावर एक दिवशी बेन किंग्स्ले, जॉन हर्ट यांना सोडून सर रिचर्ड आम्हा चौघांना रात्री जेवणासाठी घेऊन गेले होते. तिथे ते म्हणाले की, मी उद्या तुझी स्क्रिन टेस्ट पाहणार आहे. असं त्यानी मला त्यादिवशी चार वेळेला सांगितलं. तसेच मी त्यांना विचारलं की मी पाहू शकते का, तर त्यांनी होकार दिला होता. मी तुला गाडी पाठवतो. मी तो सीन पाहिला. यानंतर मला महिन्याभराने त्यांनी सांगितले की, माझी कस्तुरबा गांधींच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. गांधीजींबद्दल वाचलं ते इतिहासाच्या पुस्तकातच. यानंतर लगेचच मी मणिभवनमध्ये जाऊन मराठीत सत्याचे प्रयोग हे पुस्तक आणलं. ते पहिल्यांदा वाचल्यानंतर माझ्या लक्षात गांधीजींचा प्रवास कसा झाला ते लक्षात आलं.
मोहनदास करमचंद गांधी हा भारतात अपयशी झालेला वकील आफ्रिकेत जातो. तो एक साधा वकील महात्मा कसा झाला हा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. म्हणजे हा चित्रपट स्वातंत्र्यलढ्याचा नाही तर गांधीजींवर होता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यात घेतल्या नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्हाला गांधीजींचा प्रवास दाखवायचा आहे. जसेजसे शुटिंग होत गेलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ही फार मोठा चित्रपट होणार आहे.
प्रश्न - आजपर्यंत तुम्ही अनेक भाषांमध्ये चित्रपट केले. तुमचा गांधी चित्रपटाचा तिथला सेटवरचा अनुभव कसा होता?
उत्तर - सेटवर गेल्यानंतर आम्हाला सीनबाबत कळायचं. वातावरण खेळीमेळीचं असायचं. फार गर्दी नसायची. अनेकदा मॉनिटरवर लक्ष देत होते. एक सीन आठवतो, उदा. चंपारणहून एक माणूस बापूंना बोलवायला. आधी मी त्याला पाहते. नदीच्या पलीकडे मी कपडे धूत असते. असा तो सीन होता. नंतर मग घरातील सीन होता. तेव्हा मग रिचर्ड म्हणाले, तो जेवता जेवता सांगतोय. मग मी बाहेर असायचं कारण नाही. ते म्हणाले, तु मला दिसायला पाहिजे. मग तु यासाठी काय करू शकते? झोपाळ्यावर गांधीजी बसलेय. तो खाली जेवायला बसलाय. तर मी रोटियां बनवू शकते. मग काय करायला हवं. मग मी त्यांना पोर्टेबल चूलीबद्दल सांगितलं. तवा वगैरे ठेवला गेला. पोळ्या लाटत लाटत मी ते ऐकू शकते. म्हणजे त्यावेळेस सर रिचर्ड यांनी मला विचारलं, स्वत:चं मत थोपलं नाही.
प्रश्न - कस्तुरबांच्या आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरी जी आली, त्याबाबत तुम्ही केलेल्या अभ्यासाबाबत सांगाल?
उत्तर - कस्तुरबांच्या आयुष्यात खूप स्थित्यंतर आली. सुरुवातीला पोरबंदरमध्ये जन्म. फारच लहानपणी लग्न झालं. लग्नानंतर बापू इग्लंडला शिकायला गेले. नवऱ्याविना राहावं लागलं. त्याकाळी नवरा बरोबर नसेल तर ते आश्रितासारखं वाटण्याची भावना होती. बापू आले आणि आफ्रिकेला जाताना बोटमध्ये जावे लागले. तेव्हा बूट घालावे लागले. ज्या बाईने चप्पलही नाही घातली त्या बाईने बूट घातले. पारशी पद्धतीची साडी घातली. टेबल खुर्चीवर जेवण करावं लागलं. हे सर्व करावं लागलं.
आफ्रिकेतून परत आल्यावर त्यांना ज्या भेटवस्तू मिळाल्या होत्या त्यावेळी ते म्हणाले होते की या भेटवस्तू आपण इथेच ठेवायच्या. तिथे त्यांनी याचा ट्रस्ट बनवला होता. त्या वेळच्या भेटवस्तू म्हणजे सोनं-नाणं. त्यावेळी कस्तूरबाजी नाराज झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, माझ्या सूनांसाठी तरी मी ठेवते. ते सुद्धा बापूंनी मान्य नाही केलं. त्यामुळे सर्व तिथेच ठेवून त्यांना भारतात परत यावं लागलं. भारतात आल्यावर बापू जेव्हा भारतभर दौरा करत होते यादरम्यान, त्यांच्या डोक्यात खादी वापरण्याबाबत विचार आला. मग त्यांनी साधारण धोती वापरायला सुरुवात केली मग कस्तुरबांनीही खादी वापरायला सुरुवात केली. या विचारासोबतच विचारांमधला जो बदल होता, तो महत्त्वाचा होता. कस्तुरबांनी गांधीजींना समजून घेऊन फॉलो केलं. त्यांनी उगाचच फॉलो करायचं म्हणून केलं नाही.
प्रश्न - तुमच्या नजरेतून कस्तुरबा आई म्हणून कशा होत्या?
उत्तर - मुलांनी फॉर्मल शिक्षण घेतलं नाही, याबाबत कस्तुरबांना खंत होती. बॅरिस्टरची मुलं त्यांच्याकडे शाळेचा दाखला नाही. आपल्या घरुनच सर्व सुरू होतं, असं आपण म्हणतो. आपण आश्रमाची पाठशाळा आणि आफ्रिकेत तुरुंगात जाणे हे दोन अनुभव तुम्हाला समृद्ध करतील, तुम्हाला प्रगल्भ करतील असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, बाहेरच्या जगात फार कमी लोक हे फॉलो करत होते. हे कस्तुरबांना सलत होतं. नंतर जे हरिलालच्या बाबतीत झालं. त्याच्याजागी बॅरिस्टर होण्यासाठी हरिलालच्या चुलत भावाला पाठवलं. हे कस्तुरबांना समजत होतं. मात्र, त्याकाही करू शकत नव्हत्या. मनातल्या मनात त्यांच्या खदखदत होतं. हे सर्व गांधी चित्रपटात आलेलं नाही. मात्र, मी जगदंबा नावाचं नाटक केलं. त्यात कस्तुरबा स्वत:चं मन सांगतायत, अशा स्वरुपाचं ते नाटक होतं. हे सर्व असं चाललेलं होतं. पण याचवेळी कस्तुरबा हेदेखील समजू शकत होत्या की, गांधीजी काय विचाराचे आहेत? गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये ठेवलं होतं त्याआधी त्यांना मुंबईमध्ये अटक झाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या सभेत गांधीजी बोलले नाहीत तर कोण बोलणार? असा प्रश्न होता. सभा तर सुरू ठेवायची आहे, असं काँग्रेसचे म्हणणे होतं. पण इंग्रज गांधीजींना बोलू देणार नाहीत, हे माहित होतं. त्यांना सभेला जाण्यापूर्वीच अटक झाली होती. यानंतर जे त्याठिकाणी बोलणार होते त्या यादीत कस्तुरबांचं नाव पहिल्या यादीत होतं. मग प्यारेलालचं. इतक्या मोठ्या सभेत बोलताना गांधीजींचे विचार लोकांसमोर मांडायचे ते स्वत:ला कळल्याशिवाय कसं मांडणार? ते विचार कस्तुरबांना कळत होते. त्यामुळे त्यांना लोकांसमोर बोलता आलं. मोठ्या माणसांच्या पत्नी मागून चालतात. मात्र, कस्तुरबा गांधीजींच्या बरोबर चालल्यात. कस्तुरबांची गांधीजींसोबत फरपटल्या नाहीत. तर चालत गेल्यात.