मुंबई - नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीमुळे लाखो लोक जखमी होतात तर, शेकडोंचा जीव जातो. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची असते, असे मत आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पवई आयआयटीमध्ये आयोजित परिवसंवादात ते बोलत होते.
आयआयटी पवईमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि पत्रकारिता या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात आशियातील श्रीलंका, नेपाळ, भारत, बांगलादेश येथील आपत्ती व्यवस्थापनाबाबत संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या परिसंवादामध्ये नेपाळ येथील पत्रकारितेमधील व आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ कुंदा दीक्षित यांनी हिमालयात सध्या बर्फ वितळून २०० तलाव निर्माण झाल्याचे सांगितले. बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढल्याने हिमालयातील नद्यांना महापूर येऊन या ठिकाणी ७ ते ८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांना हिमालयातील त्सुनामी असे म्हटले जाते. तसेच या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अशा घटनांवर उपायोजना करण्यासाठी दक्षिण आशियातील देशांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत कुंदा यांनी व्यक्त केले.
याबरोबरच भारत, नेपाळ, बांगलादेश या देशामध्ये चक्रीवादळामुळे देखील मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे अधिक संशोधनाची गरज आहे. पूरपरिस्थिती व्यवस्थापन करताना संशोधनाबरोबरच सोप्या उपायांची अंमलबजावणी करण्याबरोबरच जागृतीवर भर देण्याची गरज असल्याच मत दीक्षित यांनी व्यक्त केले.
जगभरात घडणाऱ्या नैसर्गिक अथावा मानवनिर्मित आपत्तींच्या घटना पत्रकारितेमुळे तत्काळ जनतेपुढे येतात. नेपाळ मधील आपत्तीदेखील पत्रकारितेमुळेच जगासमोर आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनात आमुलाग्र बदल होत असून जीवितहानी कमी होण्यास मदत होत असल्याचेही दीक्षित म्हणाले.श्रीलंकेतील व्यवस्थापन व पत्रकारितेतील तज्ज्ञ नलका गुण रत्ने यांनी श्रीलंकेतील आपत्ती किती मोठ्या प्रमाणात आहे याची माहिती दिली. श्रीलंकेतील पत्रकारांनी महापूरामध्ये ज्या ठिकाणी सरकारी बचाव पथक पोहोचले नाही. त्या ठिकाणची माहिती जगासमोर आणून त्याठिकाणी मदत यंत्रणा पोहोचवण्यास महत्वाची भूमिका निभावली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वाची ठरत असल्याचे त्यांनी काही महत्वाचे दाखले देऊन स्पष्ट केले.