मुंबई- कोरोनामुळे देशावर आर्थिक संकट आले आहे. आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून देशातील सर्व देवस्थानांकडे असलेले सोने व्याजावर घेऊन मोठा निधी उभारावा, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरही समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व घटकांसाठी देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या १० टक्के म्हणजेच २० लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. एवढा निधी कसा उभारला जाणार आहे, याचेही स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक काही कर्ज देणार होते, त्या कर्जाचा भाग तर हे पॅकेज नाही ना, अशी शंकाही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती दोलायमान अवस्थेत जाणार हे गृहित धरूनच काम व्हायला पाहिजे. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घेतले पाहिजे. अंदाजानुसार देशातील सर्व देवस्थानात सुमारे ७६ लाख कोटी रुपयांचे सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे. सरकारने या बाबत कारवाई केल्यास कमी अवधीत मोठा निधी उभारणे शक्य होईल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडीला अखेर हिरवा कंदील