मुंबई - नववर्षची सुरुवात सुरळीत व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. हॉटेल्स, बार आणि पार्टीच्या ठिकाणी लोकांची जास्त गर्दी असते. अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी जर महिलांना घरी जाण्यासाठी वाहनाची सोय होत तर मुंबई पोलीस स्वत: त्यांना घरी सोडणार आहेत. कोणतीही अडचण आल्यास 100 क्रमांक किंवा ट्विटर हँडलवर तक्रार करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांनीसुद्धा सर्व नियोजन केले असून अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार आहे. याशिवाय, मुंबईत जवळपास 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलीस साध्या कपड्यात ठिकठिकाणी गस्त घालणार आहेत. साडेचार हजार सीसीटीव्ही कमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवण्यात येणार आहे. जवळपास 40 हजार पोलीस शहरात ठीकठीकाणी तैनात असणार आहेत.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिक पोलीसही सज्ज
समुद्रकिनारी होडीच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येणार आहे. रॅश ड्रायव्हींग आणि मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. जास्त गर्दी असणाऱ्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.