मुंबई - स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईत चाळीस हजार पोलिसांचा ताफा कार्यरत असणार आहे. त्याबरोबर राज्य राखीव पोलीस दल आणि एसआरपीएफच्या तुकड्यादेखील मुंबई शहरात दाखल झाल्या आहेत.
मुंबईतील शॉपिंग मॉल, गर्दीची ठिकाणे, रेल्वेस्थानके अशा सर्व ठिकाणी साध्या वेशात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुंबईतल्या कानाकोपऱ्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दरम्यान, कुठलीही संशयास्पद घटना, हालचाल किंवा वस्तू दिसल्यास त्याची माहिती त्वरित मुंबई पोलिसांना द्यावी; मुंबईकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.