नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात, हजारो मान्यवरांसमोर हा शपथविधी सोहळा रंगला होता. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात नंतर सुरू झालेल्या कार्यक्रमात एकूण ५८ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामधून महाराष्ट्रातील सात नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या वाट्याला सात मंत्रिपदे आली असून शिवसेनेला फक्त एकच मंत्रिपद देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार यावर चर्चा होऊ लागली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपच्या पहिल्या फळीतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांची नावे पुढे आली आहेत.
- नितीन गडकरींनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- प्रकाश जावडेकरांनी घेतील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
- पियुष गोयल यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
- शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी घेतली मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. शिवसेनेला मिळाले पहिले मंत्रिपद.
- गोव्याचे एकमेव खासदार श्रीपाद नाईक यांनी घेतली राज्य मंत्रीपदाची शपथ.
- भाजपचे खासदार रावसाहेब दानवेंनी घेतली राज्य मंत्रिपदाची शपथ.
- रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ
- भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ.