मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्कॉर्पिओ आणि विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेली स्कॉर्पिओ ही एकच असल्याची माहिती आता समोर येत आहे. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरून 18 फेब्रुवारीला ही गाडी चोरीला गेली होती. ठाण्यातील ऑटोमोबाईल व्यावसायिक मनसुक हिरेन यांची ही गाडी असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात हिरेन यांनी 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एमएच 02 वायए 2815 या क्रमांकाची ही गाडी आहे.
17 तारखेला झाली चोरी -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीसमोर एक स्कॉर्पिओ कार स्फोटकांसह आढळली होती. ही गाडी ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरून 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी झाली होती अशी माहिती आता समोर आली आहे. ठाण्यातील एका ऑटोमोबाईल व्यावसायिकाच्या मालकीची ही गाडी असल्याचे समोर आले आहे. 17 तारखेला संध्याकाळी या गाडीचे मालक मुंबईकडे जात असताना ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर ही गाडी बंद पडली होती. त्यामुळे गाडी त्या ठिकाणी उभी करून मेकॅनिकला आणण्यासाठी ते तिथून निघून गेले. यानंतर 18 तारखेला दुपारी एक वाजता मेकॅनिकला घेऊन आल्यावर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी विक्रोळी पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून 10 पथके
पोलिसांत तक्रार दिलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा नंबर एमएच 02 वायए 2815 असा आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक घटनास्थळी येऊन तपास करत आहे.