मुंबई - आज(सोमवारी) राज्यभरात अनेक ठिकाणी शाळेचा पहिला दिवस सुरू झाला आहे. परंतु मालाड-मालवणी येथील वंदे मातरम शिक्षण संस्थेच्या शाळेचा पहिला दिवस हा वाद्र्यातील म्हाडाच्या मुख्य कार्यालयाबाहेर भरला आहे. शाळेसाठी राखीव असलेल्या भुखंडावर विकासकामे व्हावी, यासाठी म्हाडा कार्यालयासमोर खेळाचे वर्ग भरवत वंदे मातरम शिक्षण संस्थेने अंदोलन केले आहे.
मालाडमध्ये म्हाडाचे 13 भूखंड असून त्यापैकी काही भूखंड हे शाळा आणि मैदानासाठी राखीव आहेत. परंतु या ठिकाणी कोणतीही विकासकामे झाली नसून त्या ठिकाणी दारुडे आणि गर्दुल्ले यांचा वावर असतो. यामुळे या ठिकाणी विकास व्हावा, यासाठी आज म्हाडा कार्यालयासमोर खेळाचे वर्ग भरवण्यात आले आहेत.
या अनोख्या आंदोलनाला 10 जून रोजी सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाला सहा दिवस उलटले असूनही म्हाडा अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे वर्ग भरवून हे आंदोलन सुरू राहील, असे संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हाडाचे कार्यकारी अधिकारी आणि संस्थाच्या प्रतिनिधींची बैठक घडवून मध्यस्थी केली होती. मात्र म्हाडा प्रशासन कुठलीह कार्यवाही करत नसल्याचे संस्थेचे सचिव फिरोज शेख यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुलांना खेळायला मैदाने नाहीत. शाळेसाठी आरक्षित असलेल्या मैदानात जागोजागी दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. त्या साफ करून मग खेळावे लागते, असे फिरोज शेख यांनी सांगितले आहे.