मुंबई - लॉकडाऊनमुळे औषध उत्पादक आणि वितरक यांच्यातील साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी मुंबईत औषधांचा तुडवडा निर्माण होऊ लागल्याचे वितरक-औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए) एक पत्र लिहीत आपल्या अडचणी मांडल्या आहेत.
वितरक-औषध विक्रेत्यांनी अडचणी सोडवण्याची ही मागणी केली आहे. पण एफडीए मात्र सर्व अडचणी सोडवण्यात येत असून कुठेही औषधांची टंचाई नसल्याचा दावा करत आहे. त्यामुळे आता वितरक आणि एफडीए यांच्यातच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
औषध उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र ही औषधे कंपनीतून गोदामात आणि पुढे वितरकांपर्यंत पोहचवण्यासाठी अजूनही मनुष्यबळ मिळत नसल्याने कंपनीतून गोदामात आणि पुढे वितरकापर्यंत पोहोचत असल्याची माहिती वितरक आणि अंधेरी केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष हकिम कपासी यांनी दिली आहे. तर ज्या काही अडचणी आम्हाला येत आहेत त्या आम्ही पत्राद्वारे मुख्यमंत्री तसेच एफडीएसमोर मांडल्या आहेत. तर त्या अडचणी शक्य तितक्या लवकर सोडवत औषध टंचाई दूर करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
एफडीएने मात्र औषध वितरण साखळीतील अडथळे दूर करण्यात येत आहेत. या आठवड्याभरात परिस्थिती चांगली सुधारल्याची माहिती विकास बियाणी, सह आयुक्त, मुख्यालय, एफडीए यांनी दिली आहे. वितरकाचे पत्र आले होते, या पत्रानुसार आम्ही योग्य ती कारवाई करत असल्याचे ही बियाणी यांनी सांगितले आहे. पण कपासी यांनी मात्र परिस्थिती आहे तशीच असून ती पुढे आणखी बिघडली तर औषध टंचाईचा प्रश्न गंभीर होईल असे ही ते म्हणाले.