मुंबई Savitribai Phule Jayanti : देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. भारताच्या पहिल्या शिक्षिका होण्याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं. त्याकाळी शिक्षण तर सोडाच, स्त्रियांना घराबाहेर पडणे अशक्य होतं, अशावेळी सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सावित्रीबाई या केवळ समाजसुधारकच नव्हत्या, तर त्या एक तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता मुख्यतः निसर्ग, शिक्षण आणि जातिव्यवस्थेचं निर्मूलन यावर केंद्रित होत्या. ज्या काळात देशात जातीव्यवस्था शिगेला पोहोचली होती, त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाहांनादेखील प्रोत्साहन दिलं होतं.
18व्या वर्षी मुलींना शिकवण्यास सुरुवात : सावित्रीबाई फुले यांच्यासमोर त्यांच्या वातावरणातील मुलींना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाप्रती जागृत करणे, हे आव्हानात्मक काम होतं. सुरुवातीच्या काळातील चळवळीचं श्रेय पुरुष सुधारकांना दिलं जात असलं तरी, त्यात महिलांचाही सक्रिय सहभाग होता. हे नाकारुन चालणार नाही. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं झाला. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्याच मुली शिक्षणानंतर शाळांमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून भूमिका पार पाडत होत्या.
आंतरजातीय विवाहासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना : देशातील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात 1848 मध्ये स्थापन केली. सावित्रीबाई फुले यांनी या शाळांमध्ये केवळ शिकवलंच नाही, तर मुलींनी शाळा सोडू नये, यासाठी मदतही केली. त्यांनी विना पुरोहित विवाह करण्याला प्रोत्साहन दिलं. तसंच हुंडा पद्धतीला विरोध केला. आंतरजातीय विवाह व्हावा, यासाठी पती ज्योतिबा फुले यांच्यासह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रात प्लेग पसरल्यानंतर, त्यांनी आपल्या मुलासह 1897 मध्ये प्लेगग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुण्यात रुग्णालय सुरू केलं होतं. मात्र, रूग्णांची सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेगचा त्रास झाला. 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
- राज्य सरकारच्या वतीनं सावित्री उत्सव : महाराष्ट्र सरकारनं चार वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास खात्याच्यावतीनं हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो.
हेही वाचा :