मुंबई - देशभरात विविध ठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात येत आहे. सरदार पटेल यांची जयंती तसेच इंदिरा गांधी यांचा स्मृती दिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी 'रन फॉर युनिटी' म्हणजेच एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
हिंगोली - येथील अग्रसेन चौक, बस स्थानक, इंदिरा गांधी चौकापर्यंत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी एकता रॅलीला हिरवा झेंडा दाखविली. एकता दौड रॅलीत विविध अधिकारी, कर्मचारी अन नागरिकांनी सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेची शपथही घेतली.
हेही वाचा - ऐन भाऊबीजेच्या दिवशी भावा-बहिणीची कायमची ताटातूट; अपघातात भावाचा मृत्यू
जालना - मस्तगड येथील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. त्यानंतर, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सद्भावना दौडला सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा - परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान, रावसाहेब दानवेंनी केली पाहणी
रायगड - जिल्ह्यातील अलिबाग क्रीडा भवन येथे सकाळी ७ ला राष्ट्रीय एकता दौड 2019 अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित एकता दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात आला. ही एकता दौड जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा विभागाकडून आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लहानापासून, जेष्ठ नागरिकांसह तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा - सिद्धगडावर दीपोत्सव करून हुतात्म्यांना आदरांजली
गडचिरोली - जिल्हा प्रशासन, पोलीस दल, केंद्रीय राखीव दल यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ वाजता राष्ट्रीय एकता दौड पार पडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय बंसल, केंद्रीय राखीव पोलीस दल 192 तुकडीचे कमांडर सिंग यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या दौडला सुरुवात करण्यात आली. या दौडमध्ये गडचिरोलीचे शेकडो तरुण धावले. यावेळी उपस्थित प्रशासकीय कर्मचारी, पोलीस दलाचे जवान, केंद्रीय राखीव दलाचे जवान, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी एकात्मतेची शपथ दिली.
हेही वाचा - डॉ. प्रकाश आमटेंची अनोखी 'भाऊबीज'!