मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तब्बल 6 हजार कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात अटकेत असलेला सारंग वधवानला सोमवारी रात्री पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात आर्थर रोड कारागृहात असलेल्या सारंग वाधवानला मुंबई पोलिसांनी, गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या घोटाळ्यासंदर्भात अटक केलेली आहे. 2018 साली म्हाडाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत मुंबई पोलिसांनी या संदर्भात कारवाई करत सारंगला चौकशीसाठी अटक केली.
गोरेगाव येथील सिद्धार्थनगर पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात गुरु अशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट म्हाडाकडून देण्यात आले होते. या संदर्भात गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांपैकी एक संचालक म्हणून सारंग वाधवान याचे नाव समोर आलेले होते. या अगोदर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कंपनीच्या एका संचालकाला अटक केल्यानंतर सारंगला अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यान, पत्रा चाळ पुनर्विकासात 668 रहिवाशांना घरे देण्याचा मान्य करूनही त्यांचे घर न देता म्हाडाचे गाळेही विकासकाने परत न केल्यामुळे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - बलात्कार म्हणजे पीडितेची प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करण्यासारखेच - उच्च न्यायालय
हेही वाचा - दिशाच्या मृत्यूचे सत्य प्रियकराने सांगावं अन्यथा मी सांगतो - नितेश राणे