मुंबई Sanjay Raut on EC : विरोधकांकडून उद्धव ठाकरेंविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येत आहे. यावरही राऊतांनी प्रत्युत्तर देत ती प्रायोजित केलेली याचिका असल्याचा दावा केला. त्या याचिकेनं काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरेंनी न्यायालयाचा अवमान केला नाही. स्वतः सरन्यायाधीश म्हणाले, आम्हाला तारीख पे तारीख नको. त्यामुळं ती याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात येत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
निवडणूक आयोगावर टिकास्त्र : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कुणाची? हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत. तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की राष्ट्रवादी कोणाची? बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेतही झालेला होता. त्यांनी बेईमानी केली होती. त्यांनी फक्त आमदार पळविले नाहीत. पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस प्रतिज्ञापत्र दिले होते. पण, इलेक्शन कमिशननं त्याचा संदर्भ न घेता एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्याबाबतही तोच प्रश्न उपस्थित होतोय, अशी शब्दांत खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टिका केलीय.
निवडणूक आयोग पिंजऱ्यातला पोपट : पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "देशाच दुर्दैव आहे की, निवडणूक आयोगाला कळत नाही की, या पक्षाचं मालकी नेतृत्व कोणाला कोणाकडे आहे. पाकिस्तानला माहित आहे की, शिवसेना ठाकरेंची आहे. पण, निवडणूक आयोगाला माहित नाही. पूर्वीच्या काळी कबील्यांचा ताबा घेत लुटमार करणाऱ्या टोळ्या होत्या. अशा राजकारणात भाजपानं टोळ्या निर्माण केल्या आहेत. पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिलं जातंय, हे दुर्दैव आहे. निवडणूक आयोगानं काहीही निर्णय घेऊ द्या, शिवसेना बाळासाहेबांची होती आणि पुढेही राहील. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. पण, सध्या पिंजऱ्यातला पोपट झालेली आहे, या पोपटाची पिसंही जळून गेलेली आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर केलीय.
निवडणूक आयोगात राष्ट्रवादीची सुनावणी- शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सध्या धुसफूस सुरू आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर सतत आरोप करत आहेत. शरद पवार गटानं गुरुवारी निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटावर आरोप केले आहेत. अजित गटानं पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय. तसंच खोटे पुरावं सादर केल्याबद्दल शरद गटानं अजित गटावर दंडात्मक कारवाईची मागणीही केलीय.
हेही वाचा :