मुंबई Sanjay Raut On Chadrashekhar Bawankule : आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bawankule) यांचा मकाऊतल्या कॅसिनोमधील फोटो पोस्ट केला होता. राऊतांच्या या पोस्टनंतर राऊत आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर राऊतांच्या पोस्टला उत्तर देताना भाजपाने आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) फोटो पोस्ट करत "या ग्लासमधून आदित्य ठाकरे कोणत ब्रँन्ड पित आहेत?, हे संजय राऊत यांनी सांगावे", असा पलटवार भाजपाने राऊतांवर केला होता. तसंच या फोटोबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला होता. 'मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे'. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकत्र आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. परंतु यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.
अजून 27 फोटो आहेत : माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे कुठे आणि कोणासोबत गेले होते, ते मला माहीत आहे. ते म्हणतात की, मी कुटुंबासोबत गेलो होतो. पण अशी किती कुटुंब आहेत? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. याबाबत माझ्याकडे आणखी व्हिडिओ आणि फोटो आहेत. अजून माझ्याकडे 27 फोटो आहेत. पण राज्यातील परिस्थिती काय आहे, याचं मला भान आहे. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, भाजपाचे संस्कार नाहीत. त्यामुळं मी त्याचं भान राखणार आहे, असा टोला देखील राऊतांनी भाजपाला लगावला.
'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही'. कारण आम्ही खूप भोगत आहोत. ईडी, तपास यंत्रणा यांना कारण नसताना सामोरे गेलो आहोत. जर मी २७ फोटो बाहेर काढले तर, त्यांना दुकान बंद करावं लागेल. पण त्यांचं दुकान २०२४ पर्यंत चालू राहिलं पाहिजे. - संजय राऊत, खासदार
मोदी पितात... तोच आदित्य यांचा ब्रँन्ड : मी व्यक्तीगत टीका केली नाही, पण सुरुवात तुम्ही केली. त्यामुळं आम्हाला असं वागावं लागत आहे. या फोटोबाबत नाना पटोलेंनी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळं नाना पटोलेंच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान, भाजपाने आदित्य ठाकरेंचा फोटो पोस्ट करुन आदित्य ठाकरेंचा ब्रँन्ड कोणता, असं म्हटलं आहे. असा प्रश्न राऊतांना विचारला असता, पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन जी पितात, तोच बॅन्ड आदित्य ठाकरे पितात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
- 'हा सामना भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नाही तर भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया होता', राऊतांचा घणाघात
- महाराष्ट्राच्या राजकारणातलं द्युत; राऊतांनी पोस्ट केला बावनकुळेंचा जुगार खेळतानाचा फोटो, आणखी २७ फोटोंसह ५ व्हिडिओ असल्याचा दावा
- भारतीय संघ फायनल जिंकला की म्हणताल मोदींमुळेच जिंकलो- संजय राऊत यांनी श्रेयवादावरून भाजपाची उडविली खिल्ली